सुरक्षेतील चूक की षड्यंत्र

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौर्यात सुरक्षा व्यवस्थेतील चूक ही केवळ साधी चूक होती की कट होता, याच्यावर आता भरपूर चर्वितचर्वण आणि राजकारण सुरू आहे. भाजपने प्रथमच मोदी यांना ठार मारण्याचा प्रयत्न होता, असा आरोप केला आहे. यापूर्वी मोदी यांना जिवे मारण्याचा कट होता, असा आरोप भाजपने केला नव्हता. भाजपला पंजाब निवडणूक होईपर्यंत हा मुद्दा तापवायचा आहे, हा एक भाग. यावरून काँग्रेसला पुरते बदनाम करून राज्यात निवडणूक जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न यशस्वी होऊ शकेल की नाहि, हे निवडणूक निकालानंतर समजेल. परंतु पंजाबात जो काही प्रकार घडला, त्याने पंजाबसारख्या दिलदार म्हणवल्या जाणार्या राज्याची प्रतिमा कलंकित झाली आहे. पंतप्रधानांसारख्या सर्वोच्च नेत्याचा ताफा एका पुलावर ओलिस असलेल्या स्थितीत पंधरा मिनिटे अडकून रहाणे ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. शेतकरी निदर्शने करण्यास जमले होते आणि हे कुणाचे षड्यंत्र आहे, हे समजण्यास अकलेची गरज नाहि. आता  मुद्दा इतका गरम झाला आहे की, पंतप्रधान मोदी राष्ट्रपतींना भेटून त्यांनी या प्रकाराची कल्पना दिली आहे. राष्ट्रपतींनीही पंतप्रधानांच्या सुरक्षेबद्दल काळजी व्यक्त केली आहे. या प्रकारात कुणाचाही हात असो, पण पंजाब मात्र यामुळे बदनाम झाले आहे. मोदी आपल्या दौर्यात शेहेचाळीस हजार कोटी रूपयांच्या योजना जाहिर करणार होते. त्या सार्या योजना आता बासनात गुंडाळल्या गेल्या आहेत. काही दिवसांनी आचारसंहिता लागेल  आणि मग  सार्याच घोषणांवर बंदी येईल. केंद्र सरकारने पंजाबच्या सीमेवर सीमा सुरक्षा दलाचे क्षेत्र वाढवण्याचा निर्णय घेतला. तेव्हा काँग्रेसने आकांडतांडव का केले, याचे स्पष्टीकरण यावरून देता येईल. भटिंडा विमानतळावरून मोटर ताफ्याने पंतप्रधान हुसेनीवाला राष्ट्रीय स्मारकस्थळी निघाले तेव्हा पंजाब पोलिस आणि राज्य सरकारला निश्चितच असणार. तरीही त्या मार्गावर  अगदी पूर्वसूचना दिल्याप्रमाणे शेतकरी आंदोलक जमतातच कसे, याचे उत्तर न पंजाबचे मुख्यमंत्रि चरणजीत सिंग चन्नी यांच्याकडे आहे न नवज्योत सिंग सिद्धू यांच्याकडे. असे सांगतात की पाऊस आणि अंधुक प्रकाशामुळे मोदी यांनी रस्त्याने जाण्याचा निर्णय घेतला. इतक्या कमी वेळात शेतकरी निदर्शक जमले कसे, हा सवाल देश विचारतो आहे. यात भाजपची बाजू घेण्याचा किंवा काँग्रेसवर टिका करण्याचा प्रश्न नाहि. प्रश्न पंतप्रधानांच्या सुरक्षेचा आहे आणि ते देशाचे पंतप्रधान आहेत. जर शेतकरी इतक्या कमी वेळात जमतात तर याची माहिती पंजाब पोलिस का मिळवू शकले नाहित, हाही सवाल आहे. याचा अर्थ पंजाब पोलिस हे अकार्यक्षम आहेत आणि म्हणूनच काँग्रेस सरकारला सीमा सुरक्षा दलाची लुडबूड नको होती, असा अर्थ काढला तर त्याला चूक कसे ठरवणार? चन्नी यांनी पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी आमचे रक्तही सांडू, अशी नाटकी घोषणा केली आहे. मुळात इतकी जर तयारी आहे तर ही घटना घडलीच कशी? आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही गेले आहे. त्यामुळे प्रकरणाची गंभीरता सार्या देशाला कळून चुकली आहे. शेतकरी जमणार आहेत,  ही माहिती जर पोलिसांना होती तर त्याची कल्पना पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील अधिकार्यांना का दिली गेली नाहि, हा ही सवाल आहे. सवाल तर अनेक आहेत आणि त्यात काँग्रेस आरोपीच्या पिंजर्यात आहे. राजकीय विरोध असतो आणि त्यात गैर काही नाहि. पण सर्वोच्च स्थानावरील नेत्याच्या सुरक्षेबाबत कसलीही तडजोड करता कामा नये. खास करून पंजाबसारख्या राज्यात जेथे गेल्या बर्याच काळापासून अशांतता माजली आहे. अशा ठिकाणी सुरक्षेच्या बाबतीत चूक करणे हे विलक्षण महागात पडू शकते. वर्षभर शेतकर्यांनी शांततापूर्ण आंदोलन चालवले आणि पंतप्रधानांनी त्यांच्या मागण्या मान्यही केल्या. वादग्रस्त कृषि कायदे मागेही घेतले. मग आता आंदोलन करण्याचे कारणच काय होते, हे राकेश टिकाईतही सांगू शकणार नाहित. हे तार्किक आणि गरिमा जपणारे वाटत नाहि. या मुद्द्यावर राजकारण तर केले जाणे निश्चितच होते आणि तसेच घडले. आता केंद्रिय गृहमंत्रालयानेही पंजाब सरकारकडून अहवाल मागवला आहे. काही थरांतून तर पंजाबचे राज्य सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी होत आहे. आता पंजाबात निवडणुका असल्याने भाजप हे प्रकरण निकाल लागेपर्यंत तापवणार, हे तर निश्चितच आहे. अशीच चूक होऊन देशाने एक पंतप्रधान आणि एक माजी पंतप्रधान गमावला आहे. तेव्हा सुरक्षेतील त्रुटींची चौकशी तर व्हायलाच हवी. हे पक्षीय राजकारणाच्या वर जाऊन करायला हवे. जर समोर शेतकरी आंदोलन करत होते तर त्यांना हटवले का नाहि? शेतकर्यांच्या आंदोलनाला आता काहीच अर्थ नाहि. सार्या मागण्या मान्य झाल्यावर आंदोलन करणे हे केवळ निवडणुकीत आंदोलनाचा फायदा उठवण्याचा काँग्रेसचा डाव असू शकतो. सर्वात गंभीर प्रश्न तर हा आहे की पंतप्रधानांचा ताफा रस्त्याच्या मार्गाने येत आहे, ही माहिती शेतकर्यांना कुणी दिली? अशा लोकांना शोधून काढून कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे. पंजाबच्या शेतकर्यांची दादागिरी देशाने पाहिली आहे. गरिब, दीनवाणा शेतकरी हा नाहि, जो देशाला माहित आहे. अशा बनावटी शेतकर्यांना जबरदस्त धडा शिकवला पाहिजे आणि त्याचवेळी खर्या शेतकर्यांना दैन्यावस्थेतून वरही आणले पाहिजे.