साक्षी, अनन्या, क्रिशा, प्रसन्न, समिरन, प्रिन्स यांनी पटकावले महाराष्ट्राच्या संघात स्थान

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

साक्षी, अनन्या, क्रिशा, प्रसन्न, समिरन, प्रिन्स यांनी पटकावले महाराष्ट्राच्या संघात स्थान

ठाणे : नुकतीच पिंपरी चिंचवड येथे ५५ वी महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना सरस्वती क्रीडा संकुलाच्या जिम्नॅस्ट्सनी पदकांची लयलूट केली.स्पर्धेत १३सुवर्ण, १४ रौप्य आणि ४ कांस्यपदकासह एकूण ३१ पदकांची कमाई करत सरस्वतीच्या साक्षी दळवी, अनन्या शेट्टी, क्रिशा जतिन शाह, प्रसन्न कुचेकर, समिरन जोशी आणि प्रिन्स जैन यांनी आगामी राष्ट्रीय अजिंक्यपद आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक स्पर्धेकरता महाराष्ट्राच्या संघात स्थान मिळवले.
सरस्वतीच्या मुलं आणि मुलींच्या आपापसातील चुरशीमुळे स्पर्धेतील १२ वर्ष वयोगटात चांगली रंगत निर्माण झाली. या गटात मुलींमध्ये अनन्या शेट्टीला क्रिशा जतिन शाहने चांगली टक्कर दिली. अनन्याने ऑलराऊंड, बॅलेन्सिंग बीम,फ्लोअर एक्सरसाईज आणि सांघिक सुवर्णपदकांसह अनईव्हन बार प्रकारात रौप्यपदक जिंकत राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपली दावेदारी पक्की केली. क्रिशाने राज्याच्या संघात जागा मिळवताना सांघिक सुवर्णपदकासह ऑलराऊंड आणि बॅलेन्सिंग बीम प्रकारात रौप्यपदक, अनईव्हन बार प्रकारात कांस्यपदक जिंकले. या वयोगटात मुलांमध्ये प्रसन्न आणि समिरनमध्ये पदक जिंकण्यासाठी चुरस रंगली. प्रसन्नने रोमन रिंग, टेबल व्हॉल्ट आणि हायबार मध्ये सुवर्ण पदक जिंकत वरचष्मा राखला. याशिवाय प्रसन्न ऑलराऊंड आणि सांघिक रौप्यपदकाचाही मानकरी ठरला. समिरनने पॅरलल बार प्रकारात सुवर्णपदक जिंकले. तर समिरन पॉमेल हॉर्स आणि सांघिक प्रकारात रौप्य, ऑलराऊंड आणि फ्लोअर एक्सरसाईज प्रकारात कांस्यपदकाचा मानकरी ठरला. श्रीराज जगदाळेला सांघिक रौप्यपदक मिळाले.
मुलांच्या १४ वर्ष गटात प्रिन्स जैनने हॉरीझॉनटल बार प्रकारात कॅत्सेव या कठीण कसरतीचे महाराष्ट्रात प्रथमच सादरीकरण करत सर्वांचे लक्ष् वेधून घेतले. या प्रकारात बारवर एक हात सोडून घड्याळाच्या उलट्या दिशेने वर्तुळाकार फेरी मारत मध्यावर आल्यावर बार पुन्हा दोन्ही हाताने पकडतात. हॉरीझॉटलबारसह प्रिन्सने पॉमेलहॉर्स प्रकारात सुवर्ण जिंकले. याशिवाय प्रिन्स ऑलराऊंड, रोमन रिंग्ज आणि सांघिक रौप्यपदकाचा मानकरी ठरला. फ्लोअर एक्सरसाईज प्रकारात मात्र त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. या गटात हार्दिक आंबेकर आणि आर्यन कोळेकर सांघिक रौप्यपदकाचे विजेते ठरले. मुलींच्या १० वर्ष गटात साक्षीने ऑलराऊंड आणि फ्लोअर एक्सरसाईज प्रकारातील सुवर्णपदकासह बॅलेन्सिंग बीम प्रकारात रौप्यपदक जिंकले. करोना महामारीमुळे मुलांना बाहेर सराव करता आला नसला तरी त्यांनी ऑनलाईन पद्धतीने सराव सुरु ठेवला होता. त्यामुळे लॉकडाऊन उठवल्यावर प्रत्यक्षात सराव करताना मुलांना त्रास जाणवला नाही. मुलांच्या या मेहनतीचे फळ त्यांना राज्य स्पर्धेत मिळाल्याचे सरस्वती क्रीडा संकुलाचे जिम्नॅस्टिक खेळाचे मुख्य प्रशिक्षक महेंद्र बाभुळकर यांनी सांगितले. या पदक विजेत्यांना महेंद्र बाभुळकर यांच्यासह प्रणाली मांडवकर आणि अद्वैत वायंगणकर यांचे मार्गदर्शन मिळाले. ठाणे जिल्हा क्रीडाधिकारी स्नेहल साळुंखे, सरस्वती क्रीडा संकुलाचे व्यवस्थापक दिपक सहानी यांनी पदकविजेत्यांचे अभिनंदन करत राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.