मुख्यमंत्र्यांसह शासन आदिवासी बांधवांच्या सदैव पाठीशी - डॉ.नीलम गोऱ्हे

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मुख्यमंत्र्यांसह शासन आदिवासी बांधवांच्या सदैव पाठीशी - डॉ.नीलम गोऱ्हे

अलिबाग : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शासन आणि संपूर्ण प्रशासन आदिवासी समाजाच्या कायम पाठीशी असून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वजण सर्वतोपरी प्रयत्नशील आहेत, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी गुरुवारी दूरदृश्यप्रणालीद्वारे केले.
जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या पुढाकारातून कातकरी उत्थान अभियानांतर्गत आदिवासी कातकरी समाजातील बांधवांना वन हक्क दस्तऐवज वाटपाचा कार्यक्रम कोविड नियमांचे पालन करीत गुरुवारी पेण नगरपरिषद सभागृह येथे संपन्न झाला, त्यावेळी त्या दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून बोलत होत्या.
यावेळी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे, रायगड जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर हे दूरदृश्यप्रणालीद्वारे तर आमदार रविंद्र पाटील, अलिबाग उप वनसंरक्षक आशिष ठाकरे यांसह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे पुढे म्हणाल्या, वन हक्क कायदा मंजूर झाल्यानंतर 15 वर्षांनी आजचा हा वन हक्कांचे दस्तऐवज वाटपाचा दिवस आला आहे. त्याकरिता जिल्हा प्रशासानाचे अभिनंदन. आजच्या या दस्तऐवज वाटपाच्या कार्यक्रमामुळे आदिवासी बांधवांना त्यांची 14 हजार हेक्टर जमीन परत मिळत आहे. अशा प्रकारचा कार्यक्रम इतर जिल्ह्यातही राबविण्याबाबत पुढाकार घेण्यात येईल. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि संपूर्ण प्रशासन आदिवासी समाजाच्या कायम पाठीशी राहणार आहे. आजचा हा कार्यक्रम मी नक्कीच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचविणार आहे. तसेच आजचा कार्यक्रम जरी ऑनलाईन माध्यमातून झाला असला तरी कोविडचा जोर ओसरल्यावर आपणा सर्वांची प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी निश्चित येईन.
यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे यादेखील दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या, आजचा दिवस आदिवासी बांधवांसाठी महत्वाचा दिवस असून सर्व आदिवासी बांधवांच्या जीवनात सुधारणा आणणे, हे शासनाचे कर्तव्यच आहे. जिल्ह्यातील कर्जत, सुधागड या तालुक्यांमध्येही अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करावेत. आज आदिवासी बांधवांना हे वन हक्कांचे दस्तऐवज वाटप झाले आहेत, त्याचप्रमाणे त्यांना शासनाच्या इतर योजनांचीही लाभ देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. सध्या कोविड-19 चा प्रादूर्भाव वाढत आहे, त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी. कोविड अनुरुप वर्तनाचे पालन करीत आपले आरोग्य सांभाळा. सर्वांनी कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घ्यावेत.
यावेळी बोलताना अलिबाग उप वनसंरक्षक आशिष ठाकरे म्हणाले की, आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे. आदिवासी बांधवांच्या दृष्टीने हा एक महत्वाचा दिवस आहे. जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कातकरी उत्थान अभियानांतर्गत आदिवासी कातकरी समाजातील बांधवाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी सप्तसूत्री आखली असून त्यांच्या वन हक्कांचे 6 हजार 268 दावे निकाली काढण्यात आले आहेत.