बेपर्वाईची लाट

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

अपेक्षेप्रमाणे कोरोना महामारीचा प्रकोप पुन्हा जोरदार झाला आहे आणि तरीही आपल्या लोकांच्या बेपर्वाईच्या लाटा येतच आहेत. कोरोनाची तिसरी लाट येत असताना आपल्याकडे लोकांनी बेपर्वाई सोडून दिलेली नाहि. कोरोना असा आजार आहे की त्याचा संसर्ग इतरांना होतो आणि आपल्या चुकांचे नुकसान इतरांना सोसावे लागते.  त्यामुळे तर लोकांनी विशेषच काळजी घ्यायला हवी. त्यातच लक्षणे असलेले आणि लक्षणे नसलेले असे दोन्ही प्रकारचे लोक फिरत असतात. त्यांनाही आपल्यामुळे हा भयानक घातक रोग पसरत आहे, हे माहित नसते. अशाच सामूहिक बेपर्वाईची एक घटना पंजाबात घडली आहे. इटालीहून अमृतसरला आलेल्या विमानातील एकशे पंचवीस प्रवासी कोरोनाचा संसर्ग झालेले आढळले. आता त्यांना विलगीकरणात ठेवले असेल. पण त्यांच्यामुळे इतर कित्येकांना संसर्ग झाला असेल, याची प्रशासनाला कल्पना येणेही शक्य नाहि. असा प्रत्येक प्रवासी हा बाँब असतो. इटालीतच सर्वप्रथम कोरोनाने कहर केला होता, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. आताही इटालीत पुन्हा कोरोनाचा जोरदार हल्ला झाला आहे. यंदाही कोरोनामुळे इटालीची सर्वाधिक खराब हालत झाली आहे. आणि इटालीने अद्याप आपले ढिलाईचे धोरण सोडलेले नाहि. त्या देशातून इतर देशांमध्ये उड्डाणांना परवानगी कशी दिली जाते, हा प्रश्न आहे. आणि तेथे प्रवासापूर्वी चाचणीची पद्धत नाहि. हे विमान अमृतसरला आले म्हणून भारतीय नियमानुसार प्रवाशांची चाचणी तरी झाली. अजूनही तो देश कोरोनाबाबत बेजबाबदारच आहे आणि त्याच्या या बेजबाबदारपणाची शिक्षा इतर देशांना भोगावी लागत आहे. ही बेपर्वाई युरोपात सर्वत्र आहे. वैयक्तिक स्वातंत्र्याच्या अमर्याद आणि अवाजवी कल्पनांनी पछाडलेला युरोप असल्याने तेथे कसलीही खबरदारी घेतली जात नाहि. केंद्रिय आरोग्य मंत्रालयाच्या यादीनुसार, इटाली हा कोरोनाच्या दृष्टिने धोकादायक देशांमध्ये आहे. आणि हे जे विमान आले ते खासगी कंपनीचे होते. म्हणजे खासगी कंपन्या लुटालुटीच्या मोहात लोकांच्या आरोग्याचे निकषही सरळ धाब्यावर बसवत आहेत. खरेतर अशा विमान कंपन्यांवर सर्वप्रथम कारवाई व्हायला हवी. ज्या देशांमधून कोरोना विषाणुचे भारतात आगमन होऊ शकते, त्या सर्व देशांच्या उड्डाणांची परिक्षा झाली पाहिजे. मुळात अशा उड्डाणांना बंदीच घातली पाहिजे. जर सेवा पूर्णपणे रोखता येत नसतील तर अशाच प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी दिली पाहिजे ज्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. अमृतसरची घटना हा एक धडा आहे आणि आम्ही कोरोना प्रोटोकॉल किंवा नियमावलीबाबत तडजोड करू शकत नाहि. इटालीतील आरोग्य सेवा जगात प्रथम क्रमांकावर गणली जाते. त्या देशांमध्ये एकवेळ अशी बेपर्वाई चालून जाईल. पण भारतासारख्या देशात जेथे आरोग्यव्यवस्था अगोदरच गटांगळ्या खात आहे, तेथे हा धोका आपण पत्करू शकत नाहि. भारतात झपाट्याने कोरोनाचे आक्रमण वाढले आहे आणि दिवसाला तब्बल नव्वद हजार केसेसची नोंद होऊ लागली आहे. पुन्हा त्याच रूग्णालयातील खाटांची उपलब्धता, प्राणवायुची सुविधांची कमतरता आणि लोकांनी प्राणवायुअभावी रस्त्यात तडफडून सोडलेले प्राण असल्या समस्या उद्भवायच्या नसतील तर आपल्याला बेफिकिर किंवा जराही ढिलाई करून चालणार नाहि. हे आपल्या लोकांच्या लक्षात अजूनही येत नाहि, हे दुर्दैव आहे. जसे लोक तसेच राज्यकर्ते असल्याने नेते एकीकडे मोठमोठे मेळावे घेत असतात, निवडणूक सभा घेत असतात आणि लोकांना गर्दी करू नका, मास्क घाला असे उपदेशाचे डोसही पाजत असतात. अजून मोठ्या प्रमाणावर प्राणहानीची स्थिती पैदा झालेली नाहि, हाच काय तो दिलासा आहे. पण ती स्थिती केव्हाही येऊ शकते. दुसर्या लाटेसारखी स्थिती पुन्हा येऊ नये, असे वाटत असेल तर फारच खबरदारी घ्यायला हवी. सध्या कोरोना रूग्णांची संख्या वाढली असली तरीही रूग्णालयांवर त्याचा दबाव आलेला नाहि. पण तो कधीही येऊ शकतो. आपल्याकडे लोकांचा अफवांवरही लगेच विश्वास बसतो आणि स्थिती इतकी नाजुक आहे की कुणी जराही समाजमाध्यमांतून काहीही अफवा पसरवली तर लोक रूग्णालयांमध्ये झुंबड करू शकतात. मग रूग्णालयांची यंत्रणा कोलमडून पडेल. तज्ञांच्या सल्ल्याने निर्णय घेण्याची वेळ आली आहे. राज्यांनी तसेच केंद्र सरकारने सरकारी यंत्रणांमध्ये तपासण्यांचा दर्जा वाढवण्याची आणि गति तेज करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा भारतात पुन्हा जुनी स्थिती निर्माण होईल. पावलापावलावर आपण सावध राहिलो तरच प्रत्येकजण सुरक्षित राहिल. पण हे लोकांना पटवून देण्यात सरकारी यंत्रणा कमी पडत आहे. आणि लोकही आपली बेपर्वाई सोडायला तयार नाहित. मास्क वापरणे, सॅनिटायझरने वारंवार हात धुणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे(आपल्याकडे सोशल डिस्टन्सिंग हवे की फिजिकल डिस्टन्सिंग असला शाब्दिक वाद घालण्यात लोक कुशल आहेत) या कोरोना त्रिसूत्रीचे पालन करणे हीच खरी कोरोनाला शह देण्याची युक्ति ठरेल. खासगी क्षेत्रात कोरोना चाचण्यांचा स्तर जो आहे, त्याची बरोबरी सरकारी क्षेत्र कदापि करणे शक्य नाहि. तरीही सरकारी क्षेत्राने आपल्याकडून शक्य तितके दर्जात सुधारणा करणेही आवश्यक आहे.