प्राणवायुची सिद्धता आवश्यक

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

देशात कोरोना रूग्णांची संख्या अत्यंत वेगाने वाढत आहे आणि एका दिवसात लाखभर रूग्णांची नोंद होण्याची फ्रान्ससारखी अवस्था आपल्याकडे अद्याप आली नसली तरीही साथीचा वेग भयानक आहे. पंतप्रधान मोदी आपल्या मंत्रिमंडळाच्या वारंवार बैठका घेत असल्याने केंद्र सरकारला या साथीचे गांभिर्य लक्षात आल्याचे दिसत आहे. ज्या वेगाने रूग्णांची संख्या वाढत आहे आणि रूग्णालयातील खाटांची मागणी वाढत आहे, त्यावरून एक संदेश केंद्राकडून लोकांना देण्याची आवश्यकता आहे. घाबरू नका, पण आत्यंतिक खबरदारीही घ्या. हा संदेश वारंवार देण्याची आवश्यकता आहे. तितकीच आवश्यकता आहे ती राज्यांनीही आपल्याकडून प्राणवायुची पुरेशी सिद्धता आहे की नाहि आणि जर नसेल तर ती करण्यासाठी कामाला लागण्याची आहे. राज्य याबाबतीत स्वस्थ दिसतात. कारण केवळ रात्रीची संचारबंदीसारखे निर्बंध लावणे आणि मंदिरे वगैरे बंद करण्याच्या धमक्या देण्यापलिकडे काही होत असल्याचे दिसत नाहि. त्यामुळे केंद्राने राज्यांना याबाबतीत वारंवार आग्रह करण्याची आवश्यकता आहे. सर्व रूग्णालयांमध्ये प्राणवायु प्रकल्प चालू स्थितीत आहेत की नाहि, याची परिक्षा घेऊन त्यावर सातत्याने नजर ठेवण्याचीही आवश्यकता आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेच्या वेळेस जी आपत्तीमय स्थिती निदर्शनास आली, त्यावेळी आपत्कालिन सेवा देण्यात सरकारी आणि खासगी रूग्णालयांमधील भला मोठा फरक लक्षणीय होता. वैद्यकीय प्राणवायुची आवश्यकता अत्यंत थोड्या वेळात भयानक वेगाने वाढून त्या अभावी अनेक रूग्णांनी तडफडून प्राण सोडले. त्यामुळे संकटावर मात करण्याचे उपाय योजण्याअगोदरच स्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. गेल्या वेळेस जो धोरणाचा फियास्को झाला, त्यानंतर केंद्राच्या धोरणाचा महत्वाचा भाग म्हणजे वैद्यकीय प्राणवायुचे उत्पादन आणि वितरणाला जोरदार रेटा देण्याचा होता. त्याशिवाय सार्या रूग्णालयांनी आपापला स्वतंत्र वैद्यकीय प्राणवायुची निर्मितीचे प्रकल्प कार्यान्वित करणे हाही होता. पण जशी लाट ओसरली तसे नेहमीप्रमाणे आपल्याकडे सरकारी यंत्रणाही सुस्त होते आणि मागील वेळेस ज्याप्रमाणे काही ठिकाणी अगदी जिल्हा पातळीवर प्राणवायु निर्मिती प्रकल्प उभारले होते, त्या कामाचा वेग ओसरला. आता कुणी प्राणवायु प्रकल्पाकडे लक्षही देत नाहित. तसे पुन्हा होऊ नये, म्हणून केंद्र आणि राज्य सरकारांनी कायमस्वरूपी उपाय योजले पाहिजेत. कोरोना आपल्याबरोबर रहाणार आहे आणि आपल्याला कोरोनाबरोबर जगायची सवय करून घ्यावी लागणार आहे, असे प्रत्येक लहानमोठा नेता सांगत असतो. पण कोरोनाला प्रतिबंध करण्याचे उपाय चालू स्थितीत आणि कायम ठेवण्याचे मात्र कुणी सूचना करत नाहि. त्यामुळे वरून आदेश आल्याशिवाय बसल्या जागी मांडीही न हलवणारी सरकारी यंत्रणा लाट ओसरली आणि सरकारकडून वारंवार परिपत्रके येण्याचे बंद झाले की पूर्वीच्या सार्या यंत्रणेकडे साफ दुर्लक्ष करते. त्यामुळे सरकारी कार्यालयानीं  पूर्वी उभारलेल्या सोयीसुविधा, आरोग्यसेवा, प्राणवायु प्रकल्प धूळखात पडले असण्याचीच शक्यता जास्त आहे. आता पुन्हा कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या चर्चा होत आहेत आणि रूग्णांची संख्या भयानक वेगाने फुगत आहे. त्यावरून पुन्हा त्या जुन्या प्रकल्पांवरची धूळ झटकण्याची वेळ आली आहे. आता ते व्हायला लागेल. दुसरा महत्वाचा भाग आहे तो प्राणवायु प्रकल्प हाताळणार्यांना प्रशिक्षण देण्याचा. गेल्या लाटेत अनेक जणांचे प्राण गमावले गेले ते केवळ प्रकल्प हाताळणार्यांना तो कसा सुरू करायचा किंवा प्राणवायुचा पुरवठा रोग्याला कसा सुरू करायचा, ते योग्य रित्या माहित नसल्याने. ही मानवी चूक होती आणि त्यामुळेही अनेकांचे प्राण गेले जे वाचले असते. तेव्हा प्रशिक्षणाचा मुद्दा महत्वाचा आहे. आरोग्यसेवा विभागात यासाठी खास प्रशिक्षित कर्मचारी कायमस्वरूपी तैनात करणे आवश्यक आहे. तसेच प्राणवायुचा प्रवाह योग्य रित्या थेट रोग्याच्या नाकपुडीपर्यंत वहात आहे आणि त्यात कुठेही गळती नाहि, याची खात्री करण्यासाठी प्रात्यक्षिके ज्याला मॉकड्रिल असे म्हणतात, असे प्रयोग वारंवार केले जाण्याची आवश्यकता आहे. कोविड-१९ हा कायमस्वरूपी आणिबाणीची परिस्थितीला निमंत्रण देणारा आहे आणि तेथे ढिलाईला किंवा आराम करत बसण्याला काही संधीच नाहि. याबाबतीत हरियाणाचे मॉडेल सर्व राज्यांनी राबवणे गरजेचे आहे. केवळ हरियाणात भाजपचे सरकार आहे म्हणून ते मॉडेल नको, असा संकुचित विचार करण्याची आवश्यकता नाहि. हरियाणाने गेल्या मे महिन्यात प्रत्येक रूग्णालयाला पन्नास टक्के खाटा या प्राणवायुची सुविधा असलेल्या अशा तयार करणे सक्तिचे केले होते. तेच प्रत्येक राज्याने करायला हवे. गेल्या वेळेस देशभरातच प्राणवायुअभावी लोकांनी रस्त्यात तडफडून प्राण सोडले, ती परिस्थिती पुन्हा येणे हे देशासाठी लज्जास्पद आहे. हरियाणाचे मॉडेल राबवले तर ती परिस्थिती येणार नाहि. महाराष्ट्राने तर हे मॉडेल राबवायलाच हवे कारण प्रत्येक वेळेस लाट आली की सर्वाधिक रूग्ण हे महाराष्ट्रातच असतात. त्याला वेगळी कारणे आहेत. महाराष्ट्रात मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे आणि तेथे  सार्या जगातून लोक येत असतात. त्यामुळे महाराष्ट्रात सार्या देशापेक्षा रूग्ण  अधिक असणे साहजिकच आहे. पण म्हणून महाराष्ट्र सरकारने जास्तीत जास्त सजग रहाण्याची आणि ताबडतोब उपाय करण्याची आवश्यकता आहे. प्राणवायुच्या पुरवठ्याची आणि यंत्रणा काम करते आहे, याची सिद्धता सार्याच राज्यांनी मनावर घेऊन करणे हीच आजची खरी आवश्यकता आहे. कोरोनाचा आकडा वाढत असला तरीही घाबरण्याचे कारण नाहि कारण लक्षणे सौम्य आहेत आणि मृत्युचे प्रमाण कमी आहे. पण कोरोना त्रिसूत्री पाळताना राज्य सरकारनेही पुरेशी प्राणवायुची सिद्धता करायला हवी आहे.