पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भूतानच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने होणार सन्मान

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भूतानच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने होणार सन्मान

थिम्पू : भूतानने 'नगादा पेल गी खोर्लो' या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान करणार आहे. भूतानचे राजे आणि देशाचे शासक जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे. भूतानच्या पंतप्रधान कार्यालयाने या संदर्भात निवेदन जारी केले आहे.
पीएम मोदी यासाठी पात्र आहेत आणि भूतानच्या जनतेकडून अभिनंदन, असे फेसबुकवर जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. 'तुम्ही एक महान, अध्यात्मिक व्यक्ती असल्याचे सर्व भेटींमध्ये दिसून येते. मी तुमच्यासोबत हा सन्मान साजरा करण्यास उत्सुक आहे, असे भूतानचे राजे म्हणाले. कोरोनाच्या संकटाशी झुंज देत असलेल्या भूतानला भारताने लसीची खेप पाठवून खऱ्या शेजाऱ्याचा धर्म बजावला. तसेच पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारताची बिनशर्त मैत्री आणि समर्थनाची आठवणही राजे वांगचुक यांनी केली.
भूतानचे पंतप्रधान लोटे शेरींग यांनी ट्विटरद्वारे ही घोषणा केली. कोरोनासारख्या जागतिक संकटात भारताने भूतानला (Bhutan) हरतऱ्हेची मदत केली. त्यामुळेच भारताचे मैत्रीपूर्ण संबंध आणि सहाकार्य या आधारे हा पुरस्कार देण्यात आला. इतरही अनेक आघाड्यांवर भारताने नेहमी भूतानची साथ दिली आहे. म्हणूनच भूतानवासियांकडून शुभेच्छा देत तेथील पंतप्रधानांनी या पुरस्काराची घोषणा केली असून तो स्वीकारण्यासाठी नरेंद्र मोदी यांना भूतानमध्ये येण्याचे जाहीर आमंत्रण दिले आहे. भूतानचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार देण्याच्या पुरस्कारात आपण उपस्थित रहावे, अशी आशा करतो.
ऑक्सफर्ड-ॲस्ट्राझेनेकाच्या कोरोनावरील लस कोविशिल्डचे लाखो डोस एअर इंडियाच्या विमानाने भारताने भूतानला पाठवले. सुरुवातीच्या डोससाठी भारताने पैसे घेतले नाहीत. या लसींच्या मदतीने भूतानने तेथील नागरिकांचे लसीकरण केले. डोंगराळ प्रदेश असलेल्या भूतानच्या या यशाने जगातील सर्व देश चकीत झाले. भूतानमध्ये असे अनेक भाग आहेत जिथे जाण्यासाठी रस्ता देखील उपलब्ध नाही. बर्फाळ नद्या आणि उंच पर्वतांनी वेढलेल्या या देशाने भारताकडून मोफत लस घेत एक नवीन यशोगाथा लिहिली होती.
भूतानचे आरोग्य मंत्री दाशो देचेन वांगमो यांनी या यशाचे श्रेय देशाचे राजे आणि जनतेला दिले आहे. नागरिकांनी लस घेण्यास कुठलीही टाळाटाळ केली नाही. त्याचवेळी राजांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण लसीकरण मोहीम अतिशय प्रभावीपणे पार पडली. या डोंगराळ प्रदेशाने लसीकरण मोहीम सुरू करण्यासाठी देशभरातील आरोग्य कर्मचारी तैनात केले आहेत. कधी बर्फ तर कधी नद्या ओलांडून या आरोग्य कर्मचाऱ्यांनी एका गावातून दुसऱ्या गावात लसीकरणाचे काम सुरू ठेवले.