निर्बंधांचा अतिरेक नको, पण...

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

महाराष्ट्र सरकारने पुन्हा कडक लॉकडाऊन लावण्याचे संकेत दिले आहेत. तिकडे  केंद्र सरकारही तसलेच काही तरी संकेत देत आहेत. तसेच केंद्राने आणि अनेक राज्यांनीही निर्बंधही पुन्हा मोठ्या प्रमाणावर लागू केले आहेत. देशभरात कोरोना आणि ओमिक्रॉन रूग्णांची संख्या अत्यंत झपाट्याने  वाढत आहे, हे खरेच आहे. त्यासाठी निर्बंध हवेच आहेत. पण लोकांना जर निर्बंध नको असतील तर लोकांनीच जास्तीत जास्त प्रमाणात कोरोना त्रिसूत्रीचे पालन करणे आवश्यक आहे. व्यापारी आणि दुकानदार तसेच सामान्य ग्राहकही आता कोरोनाचे नवे निर्बंध सहन करण्याच्या परिस्थितीत नाहित. सरकारी मंत्र्यांचे काहीच जात नाहि. कारण त्यांना घरबसल्या सारे काही मिळत असते. त्यामुळे निर्बंध लावणे त्यांच्यासाठी फारच सोपे आणि सहज असते. पण सामान्य लोक, नोकरदार यांना प्रत्येक दिवस कोरोनाच्या सावटात काढणे अत्यंत अवघड झाले आहे. अजून लोक पहिल्या दोन लाटांच्या तडाख्यातून सावरलेही नाहित तोच तिसरी लाट येऊन धडकण्याच्या बेतात आहे. फेब्रुवारीत कोरोनाच्या तिसर्या लाटेत जवळपास पाच लाख रूग्ण एकट्या महाराष्ट्रात असतील, असा अंदाज आहे. हा आकडा कमी किंवा जास्तही असू शकतो. कदाचित ही दुसर्या संपूर्ण देशव्यापी लॉकडाऊनची तयारीही असू शकेल. त्यामुळे पुन्हा त्याच त्याच समस्यांना जनतेला आणि सरकारला सामोरे जावे लागणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारे ही दोन्ही लोकांचा जीव वाचवायचा की त्यांची उपजीविका वाचवायची, याच सनातन पेचात पुन्हा सापडली आहेत. यावर काहीही ठोस उपाय कुणालाही सापडलेला नाहि. महाराष्ट्र सरकारला निर्बंधांशिवाय दुसरा उपाय यापूर्वीही सुचला नव्हता आणि आताही त्याचीच पुनरावृत्ती होत आहे. नुकतीच कुठे सावरू लागलेली अर्थव्यवस्था आता पुन्हा रूळांवरून घसरू लागली आहे. आता संपूर्ण टाळेबंदी केंद्र सरकारने लावली तर पुन्हा त्यातून सावरायला फारच वेळ लागणार आहे. तिसरी लाट प्राणहानीच्या दृष्टिने जास्त धोकादायक नाहि, असे तज्ञ सांगत आहेत. पण त्यामुळे जर निर्बंध आणि टाळेबंदी लागली तर मात्र अर्थव्यवस्था कोसळून पडणार आहे. आताच मुंबई आणि दिल्लीसारख्या मोठ्या शहरांत खासगी रूग्णालयांमध्ये अकारण गर्दी करणार्यांची संख्या वाढत आहे. सुदैवाने सध्या तरी प्राणवायुची आवश्यकता दहा टक्क्यांच्यावर नाहि. पण भविष्यात त्याची गरज वाढू शकते. त्यामुळे तीही चिंता घोंघावतेच आहे. या सार्या परिस्थितीत निर्बंध लावणे ही कोणत्याही सरकारची अपरिहार्यता असली तरीही निर्बंधांचा अतिरेक करणे हा लोकांवर अन्याय ठरेल. ग्राहकांची क्रयशक्ति कमी झाली आहे आणि दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आता त्यांना दिवसा ठराविक वेळ दुकाने बंद ठेवण्यास सांगणे हे फारच दुर्दैवी ठरेल. पण एक निश्चितपणे सांगता येईल की, कोरोनाची तिसरी लाट ही आम्हीच आमंत्रित केली आहे. आपण दो गज की दूरी, मास्क है जरूरी हे पंतप्रधान मोदी यांनी सांगितलेले सूत्र विसरलो आहोत. सणासुदीच्या काळात आपण मास्क घातले नाहि, लोकांमध्ये तसेच मिसळलो. त्यामुळे पुन्हा कोरोना पसरला आणि ओमिक्रॉनचा पसरण्याचा वेग तर कोरोना विषाणुपेक्षा सहा पटींनी जास्त असल्याचे तज्ञ सांगत आहेत. त्यामुळेच इतक्या झपाट्य़ाने विषाणुचा प्रसार होत आहे. तेव्हा आता टाळेबंदी आणि कडक निर्बंध लावण्यात आले तर लोकांकडे तक्रार करण्यास जागा कुठे आहे, हा सवाल उरतोच. एकच दिलासा सध्या आहे तो म्हणजे लसीकरणाचे मोठे हत्यार सरकारकडे आणि लोकांकडे आहे. नव्वद टक्के वृद्धांचे लसीकरण झाले आहे आणि आता तर पंधरा ते अठरा वयोगटातील किशोरांचे लसीकरणही सुरू आहे. त्यातच आता तीन वर्षांवरील मुलांसाठी लसही सहा महिन्यात बाजारात येणार आहे. त्यामुळे लसीनी सुसज्ज असे नागरिक कोरोना विषाणुशी टक्कर देण्यास सक्षम झाले आहेत. तरीही आपण पूर्वीच्या चुकांपासून शिकत नाहि, हेच दुर्दैव आहे. निर्बंधांचा अतिरेक नको असे म्हणताना खरेतर रात्रीच्या संचारबंदीकडे दिशानिर्देश करावा लागेल. वास्तविक रात्री संचारबंदी लागू करून काहीच फायदा नाहि. लोक  दिवसा जास्तच मोकळेपणी फिरतात. त्यामुळे निर्बंध न लावता मास्क वापरला नाहि किंवा कोरोना प्रोटोकॉल पाळला नाहि तर जास्तीत जास्त दंड आकारावा, या निष्कर्षावर खुद्द व्यापारी आणि दुकानदारही आले आहेत. तसे असेल तर सरकारलाही वारंवार निर्बंधांची टांगती तलवार लोकांच्या डोक्यांवर ठेवावी लागणार नाहि. एकीकडे लोकांना निर्बंध पाळा असे सांगताना राजकीय पक्ष मात्र निवडणुकीच्या व्यापात मग्न आहेत. आता उत्तरप्रदेशसह पाच राज्यांत निवडणुका जाहिर केल्या आहेत. त्यासाठी निवडणूक आयोगाने अनेक निर्बंध जारी केले आहेत. पण ते अगोदरही पश्चिम बंगाल निवडणुकीतही होते. पण त्यामुळे काहीच साध्य झाले नाहि. तसेच यंदाही होणार नाहि, कशावरून हा प्रश्न येतोच. निवडणुका म्हटले की गर्दी आणि गर्दी म्हटले की कोरोना पसरण्याची भीती, हे समीकरण पक्के आहे. आता यातून कुणीच जनतेला सावरणार नाहि. एकीकडे निर्बंधांची भीती तर दुसरीकडे संसर्गाची भीती या द्विधावस्थेत सारा देश सापडला आहे.