अमरावती जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान शांततेत

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

अमरावती जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान शांततेत

अमरावती,: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी आज (सोमवार) मतदानास प्रारंभ झाला आहे. सकाळी आठ वाजता पासूनच विविध मतदान केंद्रावर मतदानासाठी युवकांबराेबरच ज्येष्ठ नागरिकांनी मतदानासाठी रांगा लावल्या. दुपारपर्यंत तब्बल 51 टक्के मतदान पार पडले असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फ़े देण्यात आली आहे. यंदाची निवडणुक ही सहकार पॅनल विरुद्ध परिवर्तन पॅनल अशी रंगतदार हाेईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 17 जागांसाठी 14 तालुक्यांतून 1687 जण मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी आज मतदानास प्रारंभ झाला आहे. यंदा या बँकेची निवडणूक चर्चेचा विषय ठरली आहे. याबराेबरच बहुतांश मतदार अमरावती जिल्ह्यातील असलेने संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. या प्रमुख कारण म्हणजे महाविकास आघाडी सरकारमधील दोन मंत्री एकमेकांच्या विरोधी पॅनलमध्ये आहेत. त्याबराेबरच विद्यमान आमदार, माजी आमदारांचा प्रत्यक्ष सहभाग यंदाच्या निवडणुकीत पहावयास मिळत आहे.जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात सहकार पॅनल असून जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख, आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप यांसह राजकारणातील आणि सहकार क्षेत्रातील दिग्गजांचा त्यांच्या पॅनलचे उमेदवार आहेत.

त्यांच्याविरुद्ध राज्यमंत्री बच्चू कडू, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके यांच्या नेतृत्वात परिवर्तन पॅनल आहे. परिवर्तन पॅनलमधून स्वतः राज्यमंत्री बच्चू कडूंनी उमेदवारी अर्ज भरला. याबराेबरच संजय खोडके, आमदार राजकुमार पटेल, आमदार प्रकाश भारसाकळे यांच्यासह सहकारातील दिग्गज मंडळी उमेदवार आहेत. सुमारे 11 वर्षानंतर अमरावती जिल्हा बँकेची निवडणूक होत आहे. गेल्या 11 वर्षांपासून बँकेवर काँग्रेसप्रणीत सत्ता होती. सहा महिन्यांपूर्वी बँकेतील 700 काेटी गुंतवणूकीचे प्रकरण समोर आले आणि कधी नव्हे ती बँक प्रचंड चर्चेत आली. संपुर्ण निवडणूकीत ही हाच मुद्दा केन्द्रस्थानी राहिला आहे.